Review once again: Meditation पुनरावलोकन: ध्यान

Ticker

6/recent/ticker-posts

Review once again: Meditation पुनरावलोकन: ध्यान

 


 पुन्हा एकदा आपण सिंहावलोकन करूयात, मागील काही प्रकरणात आपण ध्यान करण्याच्या प्रक्रिया पाहिल्या. हा एकच प्रकार सातत्याने सांगितला आहे. याचे मर्म हे आहे की आपण या एकाच प्रकारात निष्णात व्हावे हा आहे. ध्यानाचे प्रकार अनेक आहेत, पण आपण वेगवेगळे प्रयोग केल्यास, आपल्या मनाची धरसोड वृत्ती जागृत होऊन आपण भरकटले जाण्याची शक्यता आहे. म्हणून शक्यतो एकाच प्रकारे ध्यानाची क्रिया केल्याने, त्याचे आपल्या मनास व शरीरास काय फायदे आहेत, हे आपल्या लक्षात येईल.

मागील प्रकरणात जे ध्यान प्रकार पहिले त्याचे फायदे आपल्याला काही कालावधी नंतर दिसून येतील. एकच प्राणायाम वारंवार केल्याने, त्या प्राणायाम क्रियेने आपल्या शरीराला सवय लागते. आपले ध्यान किंवा ध्यानात आपले मन लवकर स्थित होत जाते. या प्राणायामाने मन शांत होऊन ते ध्यानमग्न स्थितीत रमते. ही शून्य-भावस्थिती आपल्यासाठी अविस्मरणीय अशीच असते. दिवसातले काही क्षण आपले मन बाह्य विचारातून मुक्त होऊन, अंतर्मनाचा शांत काळ अनुभवते. बाह्य विचारांची गर्दी कमी होत जाते. मनास शांत चित्ताची अनुभूती येते. यासाठी प्राणायामाचा तोच प्रकार थोड्याशा फरकाने करूयात. 

सुरुवातीस श्वासावर लक्ष केंद्रित करावे, त्याच्या आत-बाहेर होणाऱ्या क्रियेवर ध्यान द्यावे. काही विचार मनांत येत असतात त्यांना येऊ द्यात. श्वासाच्या लयीवर लक्ष ठेवल्याने, विचार कमी होत जातात.

आजुबाजूस शांत वातावरण असावे. त्यामुळे आपले लक्ष विचलित होणार नाही. एखादी सुगंधी अगरबत्ती लावल्याने मन प्रसन्न होऊन, आपल्या आजूबाजूचे वातावरण शांत चित्त अनुभूती देते. 

भिंतीला पाठ टेकवून पद्मासनात बसावे, जमत नसल्यास स्वस्थ वाटेल असे बसावे. आपले मन शांत होताना आपल्याला जाणवते. काही क्षण याचं स्थितीत बसावे. मन शांत आणि स्थिर झाले की पुन्हा श्वासांवर लक्ष ठेवा. श्वासाच्या लयीत या.

आता श्वास मोठा आणि हलका असे आलटून पालटून घ्या. आता श्वास स्थिर आणि हलका वाटायला लागतो. ही आपल्या शरीराची स्वस्थ असल्याची स्थिती आहे.

आता श्वास आत घेताना अंक मोजून घ्या, 

१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५. थांबा. ज्यांना सराव असेल ते २० पर्यंत श्वास आत घेऊ शकतात. एवढा श्वास घेऊन सामान्य स्थितीत सोडून द्या.

पुन्हा हाच प्रकार करा. श्वास मोजून घ्या व सोडा. मध्ये थोडा काही क्षण विश्राम करा व पुन्हा श्वासाची क्रिया करा. या क्रियेमुळे श्वास नियंत्रित होतो. दमा असलेल्या व्यक्तींनी हा प्रकार करू नये. वयस्क व्यक्तींनी अंक जमतील तिथपर्यंत श्वास घेण्याची क्रिया करावी. या सरावाने मन स्थिर होत जाते. 

श्वास आत घेताना डोळे शक्यतो बंद ठेवावेत, श्वास मोजून घेताना ते आपोआप बंद होतात हा अनुभव आहे. पुन्हा डोळे उघडून हीच क्रिया परत करावी.

वरील श्वासाच्या क्रिया केल्यानंतर, थोडे स्थिर होऊन विश्राम घ्या. श्वास घेताना हलका होऊ द्या.

आता श्वास घेताना पुन्हा अंक मोजून आत घ्या. आता श्वास मोजून घेताना तो पोटापासून वर-वर घेत जावा. १५ अंक येई पर्यंत तो डोक्याच्या भागात पोहोचेल. तेथे श्वास रोखून ठेवा. जमल्यास ८ ते १० सेकंद रोखून ठेवा, नाही जमल्यास ५, ६ सेकंद रोखून सोडून द्या. या क्रिया विश्राम करून कराव्यात. सुरुवातीला जमत नसल्यास आपल्या सोयीने श्वास रोखून ठेवा. या श्वासाच्या क्रिया परत परत केल्याने सराव होत जातो.


निष्कर्ष:

या श्वासाच्या अभ्यासाने मन स्थिर आणि शांत अनुभव घेते. मन ध्यान क्रियेत शिरकाव करते. मन स्थिर होत गेल्याने ते शून्यं भाव स्थितीत पोहोचते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या